ते बारा तास

           "आभाळ चांगलं भरून आलंय तुम्ही निघा आता, नायतं अडकसान मधी!", असं अण्णानी बजावलं. कांदे लावायचं काम पूर्ण झालं नव्हतं, पण वातावरण असं झालं होतं की घरी निघण्यावाचून पर्याय नव्हता. बघता-बघता अख्खं  आभाळ ढगांनी आच्छादलं. खुरपं, कळशी आणि डबा घेऊन ५:३० वाजता मी आणि आई मोटारसायकलवर निघालो. अगदी ५ किमी पुढे पोहोचलो, पावसाचा जोर वाढला, एवढ्यातच जोरदार वीज कडाडली आणि त्या विजेच्या प्रकाशात जे दिसलं...!



           जुलै २०१७. पावसाळ्याचे दिवस होते आणि कांदा लागवड सुरू होती. मोठ्या वावरात 'गावरान कांदा' लावायचा होता. रोपांची खरेदी झाली होती आणि माणसांची जमवाजमव पण आदल्या दिवशीच केली होती. मी आणि आई एका तर बाबा दुसऱ्या मोटारसायकलवर घरून केंदूरला जाण्यासाठी निघालो. पोहोचल्यानंतर वाफे तयार करून त्यात चिखल तयार केला, रोपांच्या जुडया वाटल्या आणि कांदा लागवड सुरू झाली. वातावरण पाहता लागवड युद्धपातळीवर करावी लागणार हे स्पष्ट होतं! त्यादिवशी सूर्यनारायणाने दर्शन दिलंच नाही. जोरदार वाऱ्याबरोबर काळेकुट्ट ढग पुढे वाहून जाताना दिसत होते, त्यामुळे वेळेचा अंदाजही येत नव्हता. बाबा म्हणाले, "आज चांगली बारी होणार असं दिसतंय." सायंकाळी साडे चार वाजताच अंधार पडायला सुरुवात झाली होती, त्यामुळे मीही लागवडीत मदत करत होतो. घरी हवेला घातलेलं धान्य झाकावं लागणार असल्यामुळे बाबा पाच वाजता निघाले. आम्ही मात्र काम पूर्ण करण्याच्या मागे होतो. ५ वाजेपर्यंत सगळं अंधारलं होतं.  काम पूर्ण झालं नव्हतं, 'पण उरलेलं आम्ही करतो तुम्ही निघा' असं सांगून अण्णानी घरी जाण्यास भाग पाडलं. पावसाला हलकीच सुरुवात झाली होती. मी गाडी सुरू केली आणि वातावरण आणखी बिघडायच्या आत घरी पोहचावं म्हणून वेगात गाडी दामटली. यातही सोईस्कर मार्ग म्हणून धामारी मार्गे जायचं ठरवलं. आमच्या पुढेही काही दुचाकीस्वार होते. धामारी गावात मुख्य रस्त्यावर काही ग्रामस्थ होते. काहीतरी घडलं असावं म्हणून ते तिथे जमले आहेत असं वाटलं, मी मात्र वेगात पुलाच्या दिशेने गाडी चालवत होतो. त्या ग्रामस्थांनी आवाज दिला, मी लक्ष दिलं नाही मला वाटलं ते कदाचित मला आवाज देत नसावेत. तेवढ्यात एक वीज मोठा आवाज करत कडाडली. तिच्या लख्ख प्रकाशात मला पुढे जे दिसलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. ओढयावरच्या पुलावरून तीन परसापेक्षा जास्त पाणी वाहत होतं. मी ते चित्र दिसताच गाडी थांबवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. गाडीची चाके अगदी घासत घासत पाण्याच्या जोरदार प्रवाहापासून थोड्याच अंतरावर थांबली. आई उतरून मागे पळाली. मीही गाडी मागे घेतली. कायम मर्यादेत वाहणारा ओढा एवढा वाहत होता यावरून वरचा भाग पावसाने कितपत झोडपून काढला असेल याचा अंदाज आला होता. हळूहळू इकडेही पावसाने जोर पकडला. जवळपास सात वाजले होते, मी आणि आई तिथेच एका जुन्या घराच्या आडोशाला थांबून पाऊस आणि ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह कमी होण्याची वाट पाहत होतो. दिवसभर काम करून पोटात भुकेने काहूर केलं होतं. मुख्य गावात असल्यामुळे तिथं काही दुकाने सुरू होती. तिथे एक छोटं हॉटेल होतं. तळीव पदार्थांचा घमघमाट पसरला होता आणि त्यामुळे भूक आणखीच वाढत होती. पण अगदी तासाभरात घरी पोहोचू म्हणून आईलाही काही खाऊ नाही दिलं. मागे फिरून दुसरा पर्यायी मार्ग निवडावा असं वाटत होतं पण तितक्यात पाऊस कमी झाला आणि पाण्याचा फुगवटाही ओसरला. आम्ही बरेच दुचाकीस्वार पुढच्या दिशेने निघालो. तोपर्यंत ८ वाजून गेले असावे. पुढे काही लहान ओढेही होते पण पाणीपातळी कमी असल्याने ते सहज पार करता आले. सगळीकडे पाणी आणि चिखल असल्यामुळे रस्ते निसरडे झाले होते परिणामी गाडीचा वेग कमी ठेवावा लागत होता. अंगावर रेनकोट असून सुद्धा आम्ही पूर्ण भिजलो होतो. पावसाची संततधार चालूच होती. पुढे एका ठिकाणी थांबून बाबांना फोन केला आणि '१० वाजेपर्यंत घरी येऊ' असं कळवलं. आम्ही अल्पकालीन सुटकेचा निःश्वास सोडला. अल्पकालीन यासाठी कारण पुढे जे झालं ते आणखी विलक्षण होतं. 

          आम्ही घरापासून ६ किमी अंतरावर असलेल्या जातेगावात पोहोचलो. पुन्हा पावसाने जोर धरल्याने दृश्यमानता कमी झाली होती. सुरक्षिततेसाठी आम्ही गावात थांबलो. तिथे अनेक गावकरीही उभे होते. चर्चा सुरू होत्या, "माह्या उभ्या आयुष्यात मी यावढा पाऊस नाय पायला. पुढच्या वढ्याला लई पाणी आलंय!" असे शब्द कानावर पडले आणि ज्यातून सुटलो पुन्हा त्यातच अडकलेची जाणीव झाली. सगळं चक्र फिरून पुन्हा तिथेच आल्यासारख वाटलं. गावात एस. टी. उभी होती. पुढच्या ओढ्याचा फुगवटा किती असेल याचा अंदाज मी मनात बांधत होतो. पाण्याच्या प्रवाहातून एस. टी. अगदी सहज पार होईल असं वाटलं आणि मी माझी गाडी तिथेच ठेवून एस. टी. ने जायचं ठरवलं. गावात एक सद्गृहस्थांकडे गाडी लावून मी आणि आई एस. टी. मध्ये जाऊन बसलो. त्यात आसपासच्या गावचे सहप्रवासीही होते. वेळ कसा जात होता कळतच नव्हतं. थंडगार वारा वाहत होता, पाऊसही थांबायचं नाव घेत नव्हता. पूर्ण भिजलो असल्याने थंडीने पार गारठून गेलो होतो, त्यात भुकेचा तडाखा! ११:३० वाजता गाडी निघाली. 'आता लवकर घरी पोहोचणार' यातच मी खुश होतो. गाडी ओढ्यापाशी जाऊन थांबली. इथेही पाणी पुलावरून ५ फूट वाहत होतं. चालक गाडी पुढे घेणार इतक्यात एक माणूस ओरडला, पत्रकार होता तो! त्याने चालकाला धमकी दिली, " एस. टी. पुढे नेऊन जर कोणाच्या जीवाला काही झालं तर जबाबदार कोण ? आणि जरी गाडी सुखरूप पोहोचली तरी उद्याच्याच पेपरात बातमी छापतो कि प्रवाशांच्या जीवाशी खेळ म्हणून!" चालक आणि पत्रकार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. काही प्रवाशांनी पत्रकाराला साथ दिली त्यामुळे चालकही नरमला. आता पाणीपातळी कमी होण्याची वाट पाहण्याशिवाय आम्ही करणार तरी काय होतो, भुकेनं वाजणारं पोट आणि बोचणारी थंडी! 

         रात्रीचे १२:३० वाजून गेले होते. गाडीत जवळपास १७-१८ प्रवासी होते. काहींनी गप्पा सुरू केल्या. ' आम्ही ह्या गावचे, ते आमचे पाव्हणे! तो माझा मेहुणा- साडू' असं करत नातं जोडण्याचा कार्यक्रमही सुरू झाला. त्या काही दिवसात आजूबाजूची गावेही पावसाने झोडपून काढली होती, मग त्याही गप्पा सुरू झाल्या. ' इकडं जन्वारंं वाहून गेली, माणसं गाड्यांसकट वाहून गेली. रोपं वाहून गेली, तळ्याला सांड लागली, बांध फुटले.' अशा गोष्टी कानावर येत होत्या. दिवसभर काम करून बिन अन्न- पाण्याचा बसलो होतो, काही बोलण्याची ताकद राहिली नव्हती. त्यातच एक जोडपं गाडी पुढे न्यावी की नाही यावरून वाद घालत होतं. खरेतर त्या दोघांपैकी कोणीही गाडी चालवणार नव्हतं किंवा त्यांना कोणी सल्लाही मागितला नव्हता, पण तरीही वाद चालू होता. "आता कव्हर इथं थांबायचे! गाडी पुढं न्यायला पाह्ये" यावर त्याची पत्नी थोड्या रागात उत्तरली " जीव मोलाचा की पुढं जाणं ! तुम्हालातं कायी डोकंच नाइये!" हे ऐकताच पूर्ण गाडीत हशा पिकला. थोडावेळ हे सगळं असं सुरू राहिलं. २ वाजण्याच्या सुमारास माझा  डोळा लागला. नंतर साडे चारच्या आसपास कानावर कुजबूज ऐकू आली आणि मी उठलो. वातावरण शांत झालं होतं. पाऊस थांबला होता आणि पाण्याचा प्रवाह कमी झाला होता. पुलावर मोठ्या झाडाचं खोड वाहून आलं होतं, ते आम्ही काही मंडळींनी बाजूला केलं. गाडी सुरू झाली आणि ५:३० वाजता एकदाचा काय ते घरी पोहोचलो! 

            एक तासाच्या प्रवासाला १२ तास लागतील असं कधी वाटलं नव्हतं. विलक्षण अनुभव होता तो! दुसऱ्या दिवशी चकाचक ऊन पडलं होतं. मी माझी गाडी आणण्यासाठी निघालो. जातेगावातून गाडी घेऊन निघताना गावात कालच्या पावसाच्या चर्चा सुरू होत्या. मीही त्यातल्या एक चर्चेत सहभागी झालो. काही वाक्यानंतर मी तिथून काढता पाय घेतला. मनात विचारांना उधाण आलं. कारण काल रात्रभर मी मनातून स्वतःला हा मार्ग निवडल्याबद्दल  दोष देत होतो. पण असं कळालं की ज्या पर्यायी मार्गाने जाण्याचा मी विचार करत होतो काल तेथून अनेक लोक पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेले. मी किती थोडक्यात वाचलो. आजही कधी रात्रभर पाऊस चालतो तेव्हा ते 'बारा तास' आठवतात!






Comments